पेरणीचा पाऊस
कस गाभुळल शेत,कसं टप टप भिजतय थेंबान,
हेंड फोडणारी मुंगलाई घेते विसावा कोपऱ्यात.
पडतो पाऊस टप टप, करतो रान हे तृप्त,
तांबुळ रानाला सुटलंय सुगंधी अत्तर.
कस गाभुळलं शेत…..
चंद्रकोर शिंगांची बसव अमृत महल माठी,
घाट कुंतलाच्या रानी तिफण ओढती कृष्णाकाठी.
डिरक्या फोडत चालती, बैल तांबूळ रानात,
हल्यारी देत तिफन चालवतो बळीराज.
हाया हो हाया, हरुळुक रे हाया.
लिंगोबाच्या राजा, चल रे पोटार जगाचं भराया.
कस गाभुळलं शेत…..
डौलाने चालती बसवान शेतात,
तांबड्या मातीचा गुलाल उधळीत तासात.
पडून पाऊस करी गाभुळ शेत,
चला रे करू धान्याची पेरणं.
साज हयो नवा देऊ डोंगर रानास
हिरवी साडी नेसवू घाट शिव्हारास.
कसं गाभुळलं शेत…. …..
मावळ प्रांतात नांगरल्या रानी,
वरी ,भात ,नागली पहा कशी ही सजली.
काळया कुळतीची वेल, तिला काळू बाळू शेंगांची साथ.
बांधाची ज्वार तिजवर वरण्यााची वेल,
जगदाळा सजती पानापानात,
बोर जांभळ, करवंदीच्या या देशात.
माळधावनीच्या रानभाज्या असती आमच्या ताटात.
अशा या रानास तुम्ही वरकस म्हणता का हो पावन.
त्याच्याच जीवावर आमच्या लेकरांच चाललंय पोषण.
कसं गाभूळलं शेत …. ….
कशी तरणीबांड पोर घडती आमच्या मावळात.
भगवा झेंडा फडकवती साऱ्या मुलखात.
घडली ही पोर सांगा कुणाच्या जिव्हावर,
अशा या गाभुळल्या धरतीच्या पिकावर.
कसं गाभूळंल शेत…. …..
कवी. - निशिकांत हारुगले